निम्मं वर्ष संपलं... आपल्या नववर्ष संकल्पाचं काय झालं ??


निम्मं वर्ष संपलं... आपल्या नववर्ष संकल्पाचं काय झालं ??
Blog By : Ashish D. Mane

नवीन वर्ष सुरु झालं कि नवनवीन संकल्प करण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशन मध्ये जुन्या वर्षाला लाथा मारून नवीन वर्षाच्या स्वागतात व मित्र मैत्रिणींना “हैप्पी न्यू ईअर” चे मेसेजेस फॉरवर्ड करून थकल्यानंतर अनेक कठोर संकल्प काही जण करतात. संकल्पांची ब्ल्यू प्रिंट किंवा वचननामा, जाहीरनामा देखील बरेच जण तयार करतात.

पण बरेचदा ब्ल्यू प्रिंट, वचननामा किंवा जाहीरनाम्यातले सर्व विषय तडीस जात नाहीत तसेच मनाशी केलेले सर्व  संकल्प देखील पूर्ण होत नाहीत. या वर्षात नित्यनेमाने व्यायाम करणार, पुस्तके वाचणार, आवडीचे छंद जोपासणार, रोज डायरी लिहिणार, सिगारेट सोडणार, नवीन गाडी घेणार, दारू कमी पिणार, आई वडिलांच्या पाया पडणार, नातेवाईक अथवा मित्रमैत्रीण यांच्या वाढदिवसाला न चुकता फोन करणार वगैरे वगैरे नाना संकल्प आपण करतो. एखादा मुरब्बी राजकारणी नेता जसे निवडणूक आल्यावर आश्वासनांची खैरात करतो पण पूर्ण एकही करत नाही त्याप्रमाणे आम्ही संकल्पांची खैरात करतो.

हे संकल्प करताना मोबाईल वर रिमाईंडर वगैरे लावणे, घरात नजरेस पडेल अशा ठिकाणी संकल्प लिहिणे वगैरे संकल्प पूर्ण करण्यासाठीच्या पूरक गोष्टी पण आपण करतो. परंतु आरंभशूर वृत्ती व आळसामुळे बहुतेक जणांचे संकल्प तडीस जात नाहीत. गाठोडे भर संकल्प डोक्यावर घेऊन वर्ष कधी लुप्त होऊन जाते कळतच नाही.

या सर्व संकल्पांचा हिशोब किंवा ताळेबंद आपण घेतच नाही. तो घ्यायला आपण पुन्हा ३१ डिसेंबरचा दिवस उजाडायची वाट पहातो. आपण वर्षभरात संकल्पाच्या बाबतीत काय प्रगती केली व केलेला संकल्प सिद्धीस नेला का ? या प्रश्नाचे उत्तर ३१ डिसेंबरला जर उत्तर नकारार्थी आले तर आपल्या हातात त्या संकल्पाबाबत करण्यासारखे काहीच नसते. कारण वर्ष संपलेले असते. आपण फार फार तर दुसऱ्या दिवशी सुरु होणाऱ्या नवीन वर्षाला म्हणजेच १ जानेवारीला पुन्हा तेच संकल्प मनाशी करू शकतो.

आता जुलै महिना सुरु झालाय. वर्षाचे ६ महिने म्हणजे निम्मा कालावधी संपलेला असताना आपण वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या संकल्पाचं अवलोकन आता का करू नये ? आपण केलेला संकल्प पूर्ण झाला नसेल तर उरलेल्या ६ महिन्याची वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. या कालावधीत आपण ती संधी साधू शकतो. “एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, फिर मै अपने आप की भी नही सुनता” वगैरे डायलॉग वर्षाच्या सुरुवातीला मारल्यानंतर ती कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी एक संधी निश्चितच या सहामाहीच्या अवलोकनानंतर आपल्याला मिळू शकते.

सर्व संकल्प कर्त्यांनी संकल्पाचं अवलोकन करून वर्षाच्या शेवटी ३१ डिसेंबरला “करून दाखवलं” म्हणण्याची संधी दवडू नये. “आणखी एक वर्ष सरले ! कसे सरले कळलेच नाही” हे म्हणायची वेळ येणार नाही. जो मनात ठरवलेले संकल्प पूर्ण करीन तोच प्रगती करेल, जो आळसाला मिठी मारून बसेल त्याच्यासाठी वरीस धोक्याचच असणार यात शंका नाही.

पुन्हा एकदा नवीन वर्ष संकल्प सिद्धीची एक संधी या अर्धवर्षपूर्तीनंतर या संकल्पांचे अवलोकन करून साधूया व वर्षाच्या सुरुवातीला दिलेल्या “नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे, भरभराटीचे, आरोग्यमय जावो” या सदिच्छा किमान स्वतःसाठी तरी प्रत्यक्षात आणूया.

Comments

Post a Comment